खलील जिब्रानची मुलांविषयी कविता जीवनाचे अंकुर On Children Poems by Khalil Gibran Translate In Marathi

     'तुमची मुलं' ही 'तुमची' नसतातच....... ह्या ओळी जीवनाचे अंकुर या कविते मधल्या आहेत. 'खलील जिब्रान' यांच्या द प्रोफेट या संग्रहातून इंग्रजी मध्ये प्रकाशित झालेल्या On Children ह्या जगप्रसिद्ध कवितेचा हा मराठी अनुवाद आहे.


on children poems by khalil gibran translate in marathi
on children poems by khalil gibran translate in marathi


     'खलील जिब्रान' यांचा जन्म 6 जानेवारी 1883 व मृत्यू 10 एप्रिल 1931 रोजी झाला. लेबनॉनी-अमेरिकन हे त्यांचे राष्ट्रीयत्व असून साहित्य, संगीत, शिल्पकला, तत्वज्ञान, चित्रकला या क्षेत्रात त्यांनी कार्य केले. द प्रोफेट’ ही त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती आहे. अंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या लेखनाची तुलना 'रवींद्रनाथ टागोरांशी' (गीतांजली) केली जाते. 1920 साली खलील 'जिब्रान' आणि 'रवींद्रनाथ टागोर' यांची अमेरिकेत भेट झाली होती. 'शेक्सपियर' आणि 'लाओत्झुनंतर' 'खलील जिब्रान' हा सार्वकालिक, सर्वाधिक खप असणारा तिसरा कवी आहे.

     ईश्वराचा 'प्रेषित' 'अल मुस्तफा' हा एका गावात काही दिवसाठी येतो. त्याची गावातून जाण्याची वेळ येते तेंव्हा, गावातील जमलेले लोक त्याला काही प्रश्न विचारतात. जीवनातील वेगवेगळ्या विषयावरचे ते प्रश्न असतात. त्यावर त्यांना 'अल मुस्तफाने' केलेले उपदेश, अशी कल्पना करून लिहिलेला संग्रह म्हणजे द प्रोफेट. यातील रचना म्हणजे गद्यात्मक काव्य आहे. हे उपदेश म्हणजे 'खलील जिब्रान' यांचे एकप्रकारे तत्वज्ञानच आहे. आपल्या काखेत मूल घेवून असलेली एक स्त्री त्याला म्हणते, आम्हाला मुलांविषयी काही सांगा. त्यावर तो 'प्रेषित' म्हणजे 'अल मुस्तफा' जे काही बोलतो ते म्हणजे 'On Children' ही कविता. मूळ कविता इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेली असून 'जीवनाचे अंकुर' हा तीचा मराठी अनुवाद आहे. 


जीवनाचे अंकुर

'तुमची मुलं' ही 'तुमची' नसतातच.
ती असतात,
जीवनाला असलेल्या स्वतःच्या
असोशीची बाळं.

ती येतात तुमच्यामार्फत,
परंतु तुमच्या अंशातून नव्हे.
ती असतात खरी तुमच्याजवळ,
परंतु नसतात तुमच्या मालकीची.

तुम्ही द्यावं त्यांना तुमचं प्रेम
पण लादू नयेत विचार
कारण, त्यांना आहेत ना त्यांचे स्वतःचे विचार.

तुम्ही सांभाळा त्यांचं शरीर अस्तित्व,
पण अधिराज्य नको त्यांच्या आत्म्यावर
कारण त्यांच्या आत्मा वास करतो
भविष्याच्या उदरात 
जिथं जाणं तुम्हाला शक्य नाही
अगदी स्वप्नातही नाही.

त्यांच्यासारखं होण्याचा तुम्ही प्रयत्न करावा,
परंतु त्यांना आपल्यासारखं घडवण्याचा अट्टहास नको.
कारण जीवनौघ कधी उलटा मागे वाहत नाही
अन भूतकाळात रेंगाळातही नाही.

तुम्ही आहात केवळ एक धनुष्य
ज्यातून सुटतील हे चैत्यान्याचे तीर
उद्याच्या दिशेनं
'तो' धनुर्धारी दोरी ताणेल तेंव्हा
वाका आनंदानं
बस! इतकंच!


- खलील जिब्रान

(महत्वाचे--ए. एस. नील यांच्या 'नीलची शाळा - समरहिल' चे मराठीमध्ये भाषांतर हेमलता होनवाड आणि सुजाता देशमुख यांनी केले आहे. वरील कविता याच पुस्तकातून घेतलेली आहे.)


नीलची शाळा - समरहिल हे पुस्तक विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा.


No comments: